

कवठेमहांकाळ : शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) गावाजवळील जेजेएन हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या शौचखड्ड्याची स्वच्छता करताना टाकीत गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. २७) दुपारी बाराच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही एकामागून एक टाकीत उतरल्याने हा भीषण अपघात घडला. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत हे हॉटेल आहे.
यशवंत बिरू शेळके (७५, सध्या रा. धुळगाव रोड, रोहिदास नगर, कवठेमहांकाळ; मूळ गाव अगळगाव), तुषार बाळासाहेब कोष्टी (२४, रा. जत रोड, उपजिल्हा रुग्णालयाजवळ, कवठेमहांकाळ) आणि आकाश ऊर्फ अक्षय अनिल बागडे (२२, रा. धुळगाव रोड, रोहिदास नगर, कवठेमहांकाळ) अशी मृत कामगारांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हॉटेलच्या पाठीमागे तीन फूट व्यासाचा आणि २० फूट खोल शौचखड्डा आहे. त्याची स्वच्छता करण्यासाठी कवठेमहांकाळ येथील पाच कामगार गेले होते. स्वच्छतेसाठी सर्वप्रथम ज्येष्ठ कामगार शेळके खड्ड्यात उतरले. मात्र, बराच वेळ होऊनही आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने त्यांना पाहण्यासाठी बागडे टाकीत उतरला. त्याचाही आवाज न आल्याने अखेर कोष्टी टाकीत उतरला. तिघेही बाहेर न आल्याने आणि आतून कोणतीच हालचाल न दिसल्याने वर थांबलेल्या दोन सहकाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने आरडाओरड करून स्थानिक नागरिकांना व पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या मदतीने तिघांनाही टाकीतून बाहेर काढले; मात्र तोपर्यंत त्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी तपासणी करून तिघांना मृत घोषित केले. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळी पाहणी व पंचनामा केला. तिघांचेही मृतदेह विच्छेदनासाठी कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आणि रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. एकाच वेळी तीन कामगारांचा मृत्यू झाल्याने कवठेमहांकाळ व शिरढोण परिसरात शोककळा पसरली आहे. रात्री उशिरापर्यंत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर आणि महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण नावले यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी केली.