Sangli Leopard Sighting| शिरगाव येथे शेतात बिबट्याचे तीन बछडे

वन विभागाने बछड्यांना घेतले ताब्यात; पुन्हा आईशी भेट घालून देण्याचे प्रयत्न
Leopard Sighting
शिरगाव येथे शेतात बिबट्याचे तीन बछडे
Published on: 
Updated on: 

देवराष्ट्रे : कडेगाव तालुक्यातील शिरगाव येथील तोडकर मळ्याशेजारी मौलाना यासीन पठाण यांच्या उसाच्या शेतात तोडणी सुरू असताना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. वन विभागाने बछड्यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली आहे. दरम्यान, या बछड्यांना पुन्हा त्याच शेतात सुरक्षित ठेवून त्यांची आईशी भेट घालून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कडेगाव तालुक्यातील अनेक भागात पाळीव प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये अनेक मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे. अशातच रविवारी दुपारी शिरगाव येथे उसाची तोडणी सुरू असताना मजुरांना बिबट्याची पिले आढळली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीनही बछड्यांना ताब्यात घेतले.

देवराष्ट्रे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात त्यांची तपासणी करण्यात आली. हे बछडे साधारण एक महिन्याचे असून, यामध्ये दोन नर आणि एका मादीचा समावेश आहे. बछड्यांची आई याच परिसरात असण्याच्या शक्यतेमुळे त्यांची पुन्हा आईशी भेट घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी वन विभागाने संबंधित शेतात ट्रॅप कॅमेरा बसवला असून, सायंकाळी बछड्यांना त्याच ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आले आहे. वन अधिकारी व कर्मचारी यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

मादी बिबट्या आक्रमक होण्याची शक्यता असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कट्टे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.