

कोकरुड : येळापूरपैकी आटुगडेवाडी (ता. शिराळा) येथे चोरट्यानी घर फोडून दहा तोळे सोने व 26 हजार रुपये रोख, असा सुमारे 12 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना, सोमवार, दि. 8 रोजी दुपारी घडली.
येळापूरपैकी आटुगडेवाडी येथील विश्वास तुकाराम आटूगडे हे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पत्नीसह शेतात गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांची नात घरी आल्यानंतर कुलूप काढून घरात गेली असता मागील दरवाजा, तसेच लोखंडी कपाट उघडे दिसले. तिने ही माहिती आजोबांना दिली. ते घरी आले असता लोखंडी कपाटातील अंदाजे दहा तोळे सोने, रोख 26 हजार तसेच इतर साहित्य असा अंदाजे बारा लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले. घटनेची माहिती कोकरुड पोलिसाना देण्यात आली. पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
दहा दिवसात तीन घटना
या भागात मागील दहा दिवसातील ही तिसरी घटना आहे. यामुळे येळापूर, आटुगडेवाडी, हत्तेगाव या भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.