

पलूस : तालुक्यात चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घालत सलग दुसरी घरफोडी केली आहे. बांबवडे (ता. पलूस) येथील एका घरातील चोरीत 45 हजार रुपयांचा ऐवज व रोख रक्कम लंपास झाली आहे. यापूर्वी 21 ऑक्टोबर रोजी पलूस शहरातील अनपट वस्ती, भारती नगर येथे चोरट्याने 69 हजार रुपयांची घरफोडी केली होती. फिरोज इब्राहिम शिकलगार यांनी पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शनिवारी (दि. 25) नेहमीप्रमाणे हे पती-पत्नी घराला कुलूप लावून सकाळी कामानिमित्त बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने सकाळी 10 ते 2 या वेळेत कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील स्टीलच्या डब्यात ठेवलेली 30 हजार रुपये किमतीची सोन्याची 3 ग्रॅम पिळ्याची अंगठी, 3 हजार रुपये किमतीचे चांदीचे 2 ब्रेसलेट आणि 12 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 45 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादीची मुलगी घरी परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली.
दरम्यान, याच आठवड्यात 21 ऑक्टोबर रोजी पलूस शहरातील अनपट वस्ती, भारती नगर येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तब्बल 69 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसताना, ही दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या सलग चोरीच्या घटनांमुळे पलूस परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी रात्री गस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवावे आणि चोरट्यांचा शोध तातडीने लावावा, अशी मागणी होत आहे. पलूस पोलिस ठाण्याचे पथक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.