

इस्लामपूर; मारूती पाटील : पालिका निवडणुका कधी जाहीर होणार, याबाबत अनिश्चितता असल्याने इस्लामपुरात राजकीय हालचाली थंडावल्या आहेत. निवडणुका पुढे गेल्याने शहरात राजकीयस्तरावर शांतताच पहायला मिळत आहे. तर इच्छुकांचीही चांगलीच घालमेल सुरू आहे.
नगरपालिकेतील सत्ताधार्यांचा कार्यकाल संपून डिसेंबरमध्ये वर्ष पूर्ण झाले. तीन जानेवारी 2022 पासून पालिकेवर प्रशासक आहे. पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना, आरक्षण सोडत या प्रक्रिया पूर्ण होऊन जुलैमध्ये निवडणुकाही जाहीर झाल्या होत्या. मात्र 14 जुलैला या निवडणुकांना स्थगिती आली. त्यामुळे इच्छुकांचाही हिरमोड झाला.
या निवडणुका कधी होणार, याबाबतही संभ्रमावस्था आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील, अशी चर्चा होती. मात्र अद्याप तरी निवडणुका जाहीर होण्याची शासन स्तरावर काहीच हालचाल दिसत नाही. त्यातच आता शाळांच्या परीक्षा सुरू झाल्याने निवडणुका जाहीर होण्याची शक्यताही फारच कमी आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाच तर जुन्या प्रभागरचनेनुसार होणार की नव्या प्रभागनुसार तसेच नगराध्यक्षपदाचे आरक्षण काय निघणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी व विकास आघाडीत जोरदार लढत पहायला मिळणार आहे. दोन्ही गटांनी यापूर्वी निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. मात्र निवडणुकाच पुढे गेल्याने राजकीय हालचाली पूर्णतः थंडावल्या आहेत. राज्यात सत्तांतर झाल्याने शहरातील विकास आघाडीचा आत्मविश्वास काहीसा दुणावला आहे. तर तिकडे राष्ट्रवादीच्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. सध्या तरी निवडणुका कधी जाहीर होणार, हे निश्चित नसल्याने सर्व स्तरावर शांतता आहे. इच्छुकांची घालमेल सुरू आहे. निवडणुकीची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.