सांगली : महापालिकेतील कुरबूर जयंतरावांच्या कानी

सांगली : महापालिकेतील कुरबूर जयंतरावांच्या कानी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिकेत 'काँग्रेस-राष्ट्रवादी' आघाडीतील कुरबूर, बेबनाव राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री जयंत पाटील यांच्या कानी गेला आहे. काँग्रेसने महापौरपदावर दावा सांगितल्याने पेच वाढला आहे. एकूणच या सर्व बाबींवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते काय भूमिका घेणार, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सत्तेत आहे. महापौरपद राष्ट्रवादीकडे, तर उपमहापौरपद काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसचे संख्याबळ जास्त असतानाही भाजपचे सहा नगरसेवक फोडून बहुमताची जुळणी केल्याने महापौरपद राष्ट्रवादीकडे आले. मात्र गेले वर्षभर राष्ट्रवादीकडून विश्वासात घेतले जात नसल्याचा सूर आळवत काँग्रेसने अनेकदा सवतासुभा मांडलेला आहे. गेल्या दोन महासभेत काँग्रेसने भाजपचा हात हातात धरत राष्ट्रवादीला कोंडीत पकडले आहे. राष्ट्रवादीला अल्पमतात आणले आहे. यापुढेही 'काँग्रेस-भाजप' एकसाथ राहिले तर राष्ट्रवादीला कारभारात अडचणी येणार आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमधील बेबनाव, कुरबूर संपणे आवश्यक आहे.

महापालिकेतील राष्ट्रवादीच्या एका पदाधिकार्‍यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची भेट घेतली. महापालिकेत सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीत सुरू असलेल्या बेबनावाची माहिती दिली. राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते एकत्र येऊन महापालिकेतील आघाडीला रुळावर आणतील, असे संकेत मिळत आहेत.

महापालिकेत सत्तापरिवर्तन होऊन एक वर्ष पूर्ण झालेले आहे. दि. 22 मे रोजी सव्वा वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे सत्तापरिवर्तनावेळी ठरल्यानुसार सव्वा वर्षानंतर महापौरपद काँग्रेसला मिळावे, अशी मागणी काँग्रेसकडून सुरू झाली आहे. उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण यांचे नावही चर्चेत आणले आहे. मात्र महापौरपदासाठी काँग्रेसला बहुमताची जुळणी होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इच्छुकांकडून नगरसेवकांच्या जुळणीचे आव्हान स्वीकारले जात आहे. एकूणच महापौरपदावरील दाव्याने दोन्ही काँग्रेसमध्ये नवा पेच निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news