

आटपाडी ः टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप करत चार दिवस उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालावल्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे.त्यांच्यावर डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार केले असले तरी, उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
टेंभूच्या कामाबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निवासस्थानी केलेल्या सादरीकरणानुसार बंदिस्त पाईपलाईनचे काम होणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात त्यात बदल करून कामात अनियमितता झाली आहे. मुख्य अभियंता आणि उपअभियंत्यावर थेट आरोप होत आहे पाटबंधारे खात्याचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले आणि उपअभियंता शिवाजी पाटील हे गैरप्रकारांसाठी जबाबदार असल्याचा ठपका उपोषणकर्त्यांनी ठेवला आहे.
बंदिस्त पाईपलाईनऐवजी चुकीच्या आणि अपूर्ण कामामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. आंदोलनप्रकरणी प्रशासनाने ठोस पावले उचललेली नाहीत. तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे आंदोलकांना भेटून गेले. परंतु ज्यांच्यावर आरोप होत आहेत ते उपअभियंता शिवाजी पाटील आंदोलन सुरु होताच रजेवर गेले आहेत. वरिष्ठांचा आणि त्यांचा संपर्क होत नसल्याने पाटील यांना पाठीशी घातले जात असल्याचा संशय बळावत आहे. त्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
आंदोलनकर्त्यांनी सरकार आणि संबंधित विभागाकडे ताबडतोब सखोल चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. लवकरात लवकर या प्रकरणाची दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.