Sangli News | टेंभूच्या ६ व्या टप्प्यासाठी दीड हजार कोटींची तरतूद करून २ वर्षात पूर्ण करण्याची जलसंपदा मंत्र्यांची ग्वाही : आ. सुहास बाबर
Tembhu Irrigation Project
विटा : टेंभूच्या ६ व्या टप्प्यासाठी १ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करून येत्या दोन वर्षात पूर्ण करू असे राज्याचे जलसंपदा मंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांनी सांगितल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली.
याबाबत आमदार सुहास बाबर म्हणाले, आज बुधवारी सांगलीत वारणाली येथे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याच्या जलसंपदा विभागाची आढावा बैठक झाली. यामध्ये टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याबाबत काही गोष्टी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर मंत्री विखे पाटील यांनी सकारात्मकता दाखवली.
आगामी दोन वर्षात ६ वा टप्पा पूर्ण करू, त्यासाठी पंधराशे कोटींची तरतूद केली जाईल, तसेच २० -२५ वर्षांपूर्वीचे टेंभू योजनेचे पंप टप्प्याटप्प्याने पंप बदलण्यात येणार आहेत, देविखिंडी बोगदा दुरुस्ती करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी आपण टेंभू योजनेचे पंपग्रह क्रमांक १ ते ५ पर्यंतच्या सर्व पंपग्रहाच्या ठिकाणी अतिरिक्त रोहित्र बसविण्यात यावेत, जेणेकरून वीजेविना पंपगृह बंद पडणार नाहीत अशी मागणी केली, तसेच राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन सांगली मंडळ कार्यालयाकडे द्यावे आणि राजवाडी तलावाच्या खालील जलसंपदा विभागाच्या जागेवरती पर्यटन आराखडा तयार करावा आणि तो विभागाला सादर करावा. त्या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात.
खानापूर आटपाडी तालुक्यातील साठवण तलावाच्या खालील वंचित क्षेत्र कालव्या ऐवजी बंदिस्त पाईपलाईन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे विभागाला आदेश दिले गेले आहेत. दरम्यान, मंत्रालय स्तरावर या सर्व बाबींच्या आढावा घेण्यासाठी आढावा बैठक घेऊ असेही ना.विखे पाटील यांनी आश्वस्त केल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले.

