

सांगली : ओळखीचा फायदा घेऊन महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार केल्याबद्दल राहुल मानसिंग चव्हाण (वय 24, रा. झरोना मळा, बोरगाव, ता. तासगाव) याला 10 वर्षे सक्तमजुरी व 16 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.ए. मोहंती यांनी सुनावली.
पीडित युवती 22 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. आरोपी राहुल याने तिला कॉलेजला सोडतो, असे सांगून तिला दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. त्यानंतर राहुल याने तिला तासगावात आणले व एका मोटारीत जबरदस्तीने बसवून मित्रांच्या मदतीने हातनूर येथील जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर 16 जून 2020 रोजी पीडितेला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने तिला दवाखान्यात दाखवले असता ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आई-वडिलांनी चौकशी केल्यानंतर त्या युवतीने घडलेला प्रकार व आरोपीचे नाव सांगितले.
याप्रकरणी तासगाव पोलिसात राहुल विरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पीडित युवतीचा गर्भपात करण्यात आला. सरकार पक्षातर्फे आरती साठविलकर यांनी काम पाहिले. त्यांना तासगाव पोलिस ठाण्यातील रवींद्र माळकर, पैरवी कक्षातील सुनीता कांबळे, रेखा खोत, वंदना मिसाळ यांनी मदत केली.