

तासगाव : खुजगाव ( ता. तासगाव ) येथे द्राक्षबागेत लावलेली आठ गांजाची झाडे पोलिसांनी पकडली. याप्रकरणी वसंत भीमराव गुजले (वय ५७, रा. खुजगाव ) याला पोलिसांनी अटक केली आहे. संशयित वसंत गुजले याच्या बागेतून तीन लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस कॉन्स्टेबल संतोष भीमराव माळी यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक विशाल टकले यांनी दिली.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी : " नशामुक्त अभियान"चे पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अमली पदार्थ विक्री तसेच लागवड करणाऱ्यांविरोधात पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री व लागवड करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या नुसार पोलिस निरीक्षक विशाल टकले यांनी तात्काळ कारवाई करीत अमली पदार्थ साठा, विक्री व लागवड करणारेंबाबत माहिती उपलब्ध करुन त्यांचेवर कारवाई करावी असे पोलिस पथकातील अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या.
पोलिस कॉन्स्टेबल विवेक यादव यांना गोपनीय बातमीदाराकडून वसंत भीमराव गुजले याने खुजगांव गावातून वाघजाईकडे जाणारे रस्त्यालगत असणाऱ्या शेतातील द्राक्षबागेमध्ये गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याचे सांगितले. ही माहिती पोलिस निरीक्षक विशाल टकले याना देताच त्यांनी पोलिस पथकासह त्या ठिकाणी छापा टाकणेबाबत आदेश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार खुजगांव ते वाघजाई रस्त्यालगत गट नं. १८४ मध्ये असणाऱ्या द्राक्षबागेमध्ये पोलिस पथक गेले असता सदर ठिकाणी द्राक्षबागेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गांजाच्या झाडांची लागवड केलेली दिसून आली. या द्राक्षबागेतून ३,०५,१००/-रुपये किंमतीची गांजाची आठ झाडे तीन ते चार फूट उंचीची ओलसर पाने असलेली जप्त केली. आठ झाडांचे वजन १५ किलो २५५ ग्रॅम असून पोलिसानी झाडे हस्तगत केली.
पथकात पोलिस निरीक्षक विशाल टकले, अभिजित गायकवाड, सचिन कुंभार, विनोद पाटील, प्रशांत चव्हाण, अतुल माने, विठ्ठल सानप, विवेक यादव, प्रताप पवार व दत्तात्रय काळेल यांचा सहभाग होता.