Sangli News : चोरोचीत 69 लाखांचा अफगाणी बेदाणा जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई ः विनापरवाना प्रक्रिया, रसायनांचा वापर
Bedana
अफगाणी बेदाणा
Published on
Updated on

नागज : चोरोची (ता. कवठेमहांकाळ) येथील एका बेदाणा प्रक्रिया केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून, अफगाणिस्तानातून आयात केलेला 26 हजार 6 किलो (सुमारे 26 टन) बेदाणा जप्त केला. त्याची किंमत 69 लाख 17 हजार 596 रुपये आहे.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने चोरोची येथील या केंद्राला अचानक भेट देऊन आयात केलेला बेदाणा पकडला होता. या केंद्रावर घातक रसायनांचा वापर करून बेदाण्याला कृत्रिम रंग आणि चमक दिली जात असल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली. या तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी अजितकुमार पाटील यांच्या बेदाणा प्रोसेसिंग सेंटरवर छापा टाकला. यावेळी मशिनरीच्या साहाय्याने बेदाण्याचे ग्रेडिंग आणि पॅकिंग सुरू असल्याचे आढळले. तपासणीत अफगाणिस्तानमधून आयात केलेल्या बेदाण्याचे 10 किलोचे पांढरे बॉक्स सापडले.

हा बेदाणा दिल्ली येथील देव इम्पेक्स या पेढीने न्हावाशेवा बंदरामार्फत आयात केला होता. मालगाव (ता. मिरज) येथील कोल्ड स्टोअरेजमधून हा साठा चोरोची येथील विनापरवाना केंद्रावर प्रक्रियेसाठी पाठवण्यात आला होता. मात्र, या व्यवहाराबाबत केंद्राकडे कोणतीही कायदेशीर कागदपत्रे किंवा आयात बेदाण्याच्या गुणवत्तेचा विश्लेषण अहवाल आढळून आला नाही. संबंधित पेढीकडे अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत आवश्यक परवाना नसल्याने आणि माल निकृष्ट असल्याच्या संशयावरून प्रशासनाने हा साठा जप्त केला आहे.

जप्त केलेल्या बेदाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्र. ने. जिनगर, अ. अ. पवार आणि सु. स. खांडेकर यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news