Sangli News : सांगलीत जलतरण तलावात बुडून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू

शिंदे मळा येथील घटना
Sangli News
सांगलीत जलतरण तलावात बुडून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू
Published on
Updated on

​सांगली : येथील शिंदे मळ्यातील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये जलतरण तलावात बुडून आदित्य विकास ओलेकर (वय १२, रा. कोकळे, ता. कवठेमहांकाळ) या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.

आदित्य हा कोकळे येथील शेतकरी विकास ओलेकर यांचा मुलगा. १ जून रोजी त्याला या शाळेत दाखल करण्यात आले होते. शनिवारी दुपारी चार वाजता शाळेत पोहण्याचा तास होता. इतर मुलांबरोबर आदित्यही पोहण्यासाठी तलावात उतरला. पोहत असताना तो बुडू लागला. हे लक्षात येताच उपस्थित शिक्षकांनी त्याला तत्काळ पाण्याबाहेर काढले. यानंतर त्याला उलटी झाली. शाळा प्रशासनाने त्याला तातडीने सुरुवातीला वसंतदादा कॉलेजमधील रुग्णालयात हलवले. तेथून त्यास वसंतदादा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यानच्या काळात त्याचा मृत्यू झाला.

आदित्यच्या मृत्यूची माहिती समजताच त्याचे सांगली व कोकळे येथील नातेवाईक मोठ्या संख्येने शासकीय रुग्णालय आवारात जमा झाले. शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि नगरसेवक सागर बिरनाळे हेही रुग्णालयात पोहोचले. यावेळी संतप्त नातेवाईकांनी त्यांना गाठून जाब विचारला. जलतरण तलावाची जबाबदारी असलेल्यांच्या हलगर्जीपणामुळेच आदित्यचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. आदित्यला पोहायला येत नसल्याचे त्याच्या वडिलांनी आधीच शिक्षकांना सांगितले होते. असे असतानाही, शनिवारी दुपारी जलतरण तलावात विद्यार्थ्यांची गर्दी असताना आदित्यला सुरक्षात्मक ‘फ्लोटर’ न बांधताच पाण्यात सोडण्यात आले. त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला.

घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश कदम फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news