

सांगली : येथील १०० फुटी रोडवरील माने चौक परिसरातील ‘चव्हाण बंधू मिठाईवाले’ हे दुकान उचकटून अज्ञात तीन चोरट्यांनी तब्बल ५ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली.
ही घटना ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याप्रकरणी दुकानमालक योगेश सुरेश चव्हाण (वय ४०, रा. १०० फुटी रोड, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चेतना पेट्रोल पंपाशेजारील सिल्व्हर ओक अपार्टमेंटमध्ये हे दुकान आहे. ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अज्ञात तीन चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला. तिघांपैकी दोघांनी दुकानात शिरून कॅश काऊंटरमधील ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरून पोबारा केला. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विश्रामबाग पोलिस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.