Sangli News : जिल्ह्यातही चक्काजाम; प्रसंगी रस्त्यावरच दिवाळी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन तीव्र, वाढता पाठिंबा : पहिल्या उचलीसाठी साडेचार हजारांची मागणी
Sangli News
बलवडी : फाट्यावर चक्काजाम केल्यानंतर निवेदन देण्यात आले.
Published on: 
Updated on: 

ईश्वरपूर : उसाला पहिली उचल साडेचार हजार रुपये मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर सुरू केलेले चक्काजाम आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. शासनाने आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे वेळ पडल्यास दिवाळीही रस्त्यावरच साजरी करू, असा इशारा संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.

मंगळवारी सकाळी अकरापासून संघटनेने किणी टोलनाक्यावर महामार्ग रोको आंदोलन सुरू केले. आंदोलनाची तीव्रता वाढत असून, पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवली आहे. मात्र, अवजड वाहने अनेक ठिकाणी अडकून पडली आहेत. सलग दोन दिवस महामार्ग बंद असल्याने या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आणि वाहनचालकांचे हाल होत आहेत. शेतक-यांचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह हजारो आंदोलकांनी येथे मुक्काम ठोकला आहे.

चर्चेचा प्रस्ताव नाही : शेट्टी

‘दै. पुढारी’शी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. शासनाने हे आंदोलन हलक्यात घेऊ नये. गोकुळवर सत्ता मिळवण्यासाठी शासननियुक्त सदस्यांची तातडीने नियुक्ती करण्यास मंत्रिमंडळाकडे वेळ आहे; मात्र शेतकऱ्यांच्या ऊसदरावर तोडगा काढण्यासाठी वेळ नाही, हे दुर्दैवी आहे. शासन किंवा कारखानदारांकडून चर्चेचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. जोपर्यंत ऊसदरावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.

बलवडी फाट्यावर चक्काजाम; वाहतूक ठप्प; वाहने विटा मार्गे

विटा : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बलवडी फाटा येथेही आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाने आता आक्रमक वळण घेतले आहे. दीपक लाड यांच्यासह शेकडो आंदोलकांनी रस्त्यावर झोपून चक्काजाम आंदोलन केले. परिणामी या मार्गावरील संपूर्ण वाहतूक रोखण्यात आली आहे.

‘आता माघार नाही, आता लढाई आरपारची!’ असा निर्धार करत शेकडो आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे. याचा आणखी एक परिणाम म्हणून सांगली, मिरज, कोल्हापूर आणि इचलकरंजी वगैरे भागातील वाहने विटा मार्गे खेराडे वांगी, रहिमतपूर सातारा मार्गे पुण्याकडे जात आहेत. त्यामुळे विट्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी सुरू झाली आहे.

येडेनिपाणीत टायरी फोडल्या

येडेनिपाणी : येडेनिपाणी येथून राजारामबापू साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांच्या टायरी मंगळवारी रात्री आंदोलकांनी फोडल्या. ऊस भरून गोटखिंडी - येडेनिपाणी रस्त्यावर वाहन चालकांनी दोन ट्रॅक्टर उभा केले होते. मंगळ रात्री अज्ञात आंदोलकांनी या दोन्ही ट्रॅक्टरच्या सर्व टायर फोडल्या. त्यामुळे वाहन चालकांचे मोठे नुकसान झाले आहे. आंदोलनाच्या भीतीने अनेक तोडणी मजुरांनी ऊसतोड बंद ठेवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.