

सुनील पाटील
ऐतवडे बुद्रुक : कुरळप कृषी मंडलांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री शाश्वत सिंचन शेततळे योजनेंतर्गत शेततळे उभारणीसाठी कमाल 75 हजार रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कार्वे दोन, इटकरेमध्ये एक शेततळ्याची उभारणी करून शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. या योजनेंतर्गत आकारमानानुसार अनुदान देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध राहणार आहे, असे कृषी अधिकारी पांडुरंग जावीर यांनी सांगितले.
दुसऱ्या प्रकारामध्ये प्लास्टिक, अस्तरीकरणाचे शेततळे समाविष्ट असून यासाठी शेततळे खोदकामासाठी 75 हजार रुपये आणि प्लास्टिक अस्तरीकरणासाठी स्वतंत्रपणे कमाल 75 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. प्लास्टिक अस्तरीकरणामुळे पाण्याची गळती थांबते.
शेततळ्याच्या आकारानुसार किमान 14 हजार 433 ते कमाल 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. शेतकऱ्यांनी महाडीबीटी या संकेतस्थळावरून किंवा सीएससी केंद्रावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. विथ इनलेट-आऊटलेट किंवा विदाऊट इनलेट-आऊटलेट यापैकी एक निवड करावी. सातबारा आणि आठ-अ उतारा, आधार कार्ड आवश्यक आहेत.
बळीराजाचा फायदा कसा?
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन शेततळे योजनेद्वारे उभारलेल्या शेततळ्यातील पाण्याचा वापर करून फळबाग, फुलशेती, भाजीपाला यासारखी पिके घेऊन हमखास उत्पन्न मिळवणे शेतकऱ्यांना सहज शक्य आहे. यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान नावावर एक एकर साठ गुंठे क्षेत्र आवश्यक आहे. शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी. अर्जदाराने यापूर्वी शासकीय योजनेतून शेततळे या घटकाचा लाभ घेतलेला नसावा.