

सांगली : सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सांगली जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६२ अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, तब्बल १ कोटी २८ लाख १७ हजार ५१२ रुपये किमतीचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.
नागरिकांनी सजग राहून कुठेही भेसळयुक्त किंवा कमी दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री होत असल्याचे आढळल्यास तात्काळ प्रशासनाच्या १८०० २२२ ३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी केले आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देश व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे. दिवाळीसह आगामी सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, फरसाण व चिवडा यांसारख्या पदार्थांची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. याचा फायदा घेऊन काही ठिकाणी भेसळयुक्त अथवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्री होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे.