Sangli News : सांगलीतील बैठकही निष्फळ

संघटना म्हणते... ‘४ हजार २०० हवेत’, कारखानदार म्हणतात... ‘एफआरपीनुसार दर देऊ’
Sangli News : सांगलीतील बैठकही निष्फळ
Published on: 
Updated on: 

सांगली : ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात काल, गुरुवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. शेतकरी संघटना आणि कारखानदार आपापल्या भूमिकेवर अडून राहिले. परिणामी ना संवाद पुढे जाऊ शकला, ना कोणताही निर्णय झाला.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणतीही कपात न करता प्रतिटन चार हजार २०० रुपये दर द्यावा, अन्यथा साखर कारखाने बंद ठेवावेत, अशा जाहीर केलेल्या भूमिकेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ठाम राहिले, तर दुसरीकडे एफआरपीनुसार दर देण्यास तयार असल्याची भूमिका बदलण्यास कारखानदारांनी नकार दिला. दोन्ही पक्ष ठामच राहिल्याने बैठकीचा केवळ सोपस्कार पार पडला.

दोन दिवसात तोडगा न निघाल्यास ऊस वाहतूक रोखण्यासह गाव बंद करण्याचा तसेच रास्ता रोको आंदोलनही करण्याचा पवित्रा शेतकरी संघटनेने जाहीर केला. आता राज्यस्तरावर काही निर्णय लवकर न झाल्यास आंदोलनाची धग गावा-गावापर्यंत जाण्याची चिन्हे आहेत. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, खासदार विशाल पाटील, कोल्हापूर विभागाचे साखर सहसंचालक उज्ज्वला पळसकर, सांगलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांनी एफआरपी देण्याची तयारी दर्शवली. मात्र, केवळ एफआरपी मान्य नसल्याचे 'स्वाभिमानी'च्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. निर्णय घेण्यासाठी कारखानदारांनी दोन दिवसाची मुदत मागितली. त्यावर, आधी कारखाने बंद ठेवा, त्यानंतरच चर्चा करा, असे संदीप राजोबा म्हणाले.

बैठकीला दत्त इंडिया कारखान्याचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे, भारती शुगर्सचे आर. डी. पाटील, शिंदे कारखान्याचे देवराम लोकरे, श्रीपती शुगरचे महेश जोशी, क्रांती कारखान्याचे आप्पासाहेब कोरे, उदगिरी शुगरचे सूर्यकांत पाटील, विश्वासराव नाईक कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील, उपाध्यक्ष तानाजी शिंदे, संचालक युवराज कदम, सोनहिरा कारखान्याचे सुहास देसाई, हुतात्मा कारखान्याचे शिवाजीराव पाटील, राजारामबापू कारखान्याचे शेती अधिकारी प्रशांत पाटील, डालमिया शुगरचे एस. एम. गोसावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक मनोहर पाटील, दीपक लाड, वैभव पवार, धन्यकुमार पाटील, प्रभाकर पाटील, प्रकाश माळी, सुरेखा जाधव, महेश चव्हाण, पंडित कोळेकर, भिकाजी निकम आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.