Sugarcane Potest| ऊस आंदोलनकारखाने बंद पाडण्याची भूमिका सोडा : किरण नायकवडी

तोडणी-वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाल्यास शेतकरी, मजूर आणि वाहनचालकांचे नुकसान
Sugarcane
SugarcanePudhari
Published on: 
Updated on: 

वाळवा : ऊस दराच्या आंदोलनाच्या नावाखाली राजू शेट्टी यांनी साखर कारखाने बंद पाडण्याचा प्रयत्न करू नये. कारखाने बंद राहिल्यास ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा विस्कळीत होण्याचा धोका आहे. ही यंत्रणा उभी करण्यासाठी कारखान्यांना कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची हमी राजू शेट्टी यांनी दिल्यास आम्ही स्वतः पंधरा दिवस कारखाना बंद ठेवण्यास तयार आहोत. मात्र, वारंवार कारखाने बंद पाडण्याची भूमिका सोडून अन्य मार्गाने जास्तीच्या ऊस दरासाठी लढा द्यावा, असा घणाघात हुतात्मा साखर कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ नेते किरण नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत केला. राजू शेट्टी यांना खासदार करण्यात हुतात्मा उद्योग समूहाचे मोठे योगदान होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.

नायकवडी म्हणाले, साखर कारखाने चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, याची जाणीव राजू शेट्टी यांना असायला हवी. दरवर्षी ऊस तोडणी व वाहतुकीसाठी कारखान्यांना कोट्यवधी रुपये खर्च करून यंत्रणा उभी करावी लागते. कारखाना सुरळीत सुरू राहिला तरच मजूर टिकून राहतात. अन्यथा ते काम सोडून जाण्याचा धोका असतो. मजूर निघून गेल्यास संबंधित वाहनचालक कुटुंबासह अडचणीत येतो. शिवाय, ऊस उत्पादक शेतकरीही दुसऱ्या कारखान्यांचा पर्याय शोधू लागतात. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे ऊस दराच्या मागणीसाठी कारखाने बंद पाडण्याची भूमिका शेतकऱ्यांनाच अडचणीत आणणारी ठरू शकते.

ते म्हणाले, कारखाने आम्ही पंधरा दिवस बंद ठेवण्यास तयार आहोत. मात्र, या काळात तोडणी-वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाल्यास त्याची जबाबदारी राजू शेट्टी घेणार आहेत का? उसाची एफआरपी वाढते; मात्र साखरेचे दर वाढविण्यासाठी राजू शेट्टी यांनी कधी ठोस भूमिका घेतली आहे का, असा सवाल त्यांनी केला.

साखर कारखाने हे शेतकऱ्यांचे आहेत. क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी देशात सर्वाधिक ऊसदर देण्याची परंपरा निर्माण केली. त्यासाठी कोणत्याही आंदोलनाची गरज पडली नव्हती. त्यामागे शेतकऱ्यांविषयीची खरी आस्था होती. त्यानंतर राजू शेट्टी यांनी ऊस दरासाठी आंदोलने सुरू केली आणि त्यातून ते खासदार झाले. त्यांना खासदार करण्यात हुतात्मा साखर कारखान्याचे मोठे योगदान होते, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.