

कवठेपिरान : कवठेपिरानसह मिरज तालुक्याच्या पश्चिम भागात ऊसतोडीला वेग आला आहे. अनेक गावांमध्ये शेतांमध्ये ऊसतोडीची लगबग सुरू असून, काही ठिकाणी मजुरांच्या माध्यमातून तर काही ठिकाणी मशीनच्या मदतीने ऊसतोड केली जात आहे. हंगामाला सुरुवात झाल्याने शेतकरी ऊस कारखान्यांना पाठविण्याच्या तयारीत आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदराचा तोडगा निघाला असताना सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी अद्याप दराबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला असला, तरी उत्पादकांचे लक्ष ऊसदराच्या घोषणेकडे लागले आहे.
मिरज तालुक्याच्या पश्चिम भागात ऊस हे प्रमुख नगदी पीक आहे. कवठेपिरानसह परिसरातील अनेक गावांमध्ये ऊसतोडणी सुरू झाली आहे. काही शेतांमध्ये मजुरांच्या टोळ्यांकडून तोडणी केली जात आहे. तर मजुरांची कमतरता आणि इतर तोडणीचा खर्च लक्षात घेऊन काही ठिकाणी मशीनच्या मदतीने ऊसतोड करत आहेत. त्यामुळे शेतशिवारात ऊस वाहतुकीची लगबगही वाढू लागली आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न मार्गी लागल्याने तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.