

वाळवा : येथील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या गाडीतळावर बैलगाडीच्या चाकाखाली सापडून ऊसतोडणी मजुराचा मृत्यू झाला. सखाराम हरिभाऊ गायकवाड (वय ४०, रा. घाटेवाडी, ता. केज, जि. बीड) असे मृत मजुराचे नाव आहे. शनिवार, दि. १४ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सखाराम गायकवाड दिवसभर ऊसतोडणी करून कारखान्याच्या गाडीतळावर आले होते. त्यांनी उसाने भरलेली बैलगाडी रस्त्याकडेला उभी केली होती. शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या गाडीच्या चाकाजवळ ते विश्रांतीसाठी झोपले होते. दरम्यान, मागून येणाऱ्या एका बैलगाडीचा टायर अचानक फुटल्याने मोठा आवाज झाला. या आवाजाने बैल बिथरले आणि त्यांनी समोर उभ्या असलेल्या बैलगाडीला जोराची धडक दिली. त्यामुळे त्या गाडीचे चाक सखाराम यांच्या पोटावरून गेले. या दुर्घटनेत त्यांच्या बरगड्या मोडल्या व तोंडातून रक्तस्राव होऊन ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने ईश्वरपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर सखाराम यांचा मृतदेह मूळ गावी घाटेवाडी येथे नेण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेने कारखाना परिसरात काम करणाऱ्या बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी मजुरांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबाचा आधार हरपल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.