

ईश्वरपूर : राज्य सरकारचा राज्यातील साखर कामगार आणि सहकारी साखर कारखानदारी उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे. त्यामुळे साखर कामगारांनी एकजुटीने येत्या २२ तारखेपासून सुरू होणारा बेमुदत संप यशस्वी करून शासनाला आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी केले.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या राजारामनगर येथील कार्यस्थळावर साखर कामगारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राज्य सरचिटणीस राऊ पाटील (कोल्हापूर), राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण (राजारामबापू), उपाध्यक्ष प्रदीप पाटील (सांगली), कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, कोल्हापूर जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, सचिव संजय मोरबाळे, सयाजी कदम, संजय पाटील (सातारा) आणि तानाजी खराडे आदी उपस्थित होते.
तात्यासाहेब काळे म्हणाले, राज्य सरकारने २२ जुलै रोजी कामगार कायदे रद्द करून साखर कामगारांचे संरक्षण काढून घेतले आहे. हा कायदा पूर्ववत करावा आणि साखर कामगारांच्या विविध मागण्या सोडवाव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री, कामगारमंत्री, सहकारमंत्री, कामगार आयुक्त आणि साखर आयुक्त यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे कोल्हापूर येथे शासनाला इशारा देण्यासाठी विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात २२ तारखेपासून बेमुदत संपावर जाण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. राज्यातील सर्व जिल्ह्यांत जाऊन कामगारांशी संपर्क साधला जात असून, हा संप यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावेळी उपाध्यक्ष प्रदीप शिंदे, अविनाश पाटील आणि तानाजी खराडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी क्रांतिकारी वाळवा तालुक्यातील साखर कामगार संपाच्या लढ्यात ठामपणे पाठीशी उभे राहतील, अशी ग्वाही दिली.
यावेळी शशिकांत सांडगे, चंद्रकांत पवार (सोनहिरा), तानाजी साळुंखे, विजय देशमुख (विश्वास), राजारामबापू साखर कारखान्याचे कामगार प्रतिनिधी विकास पवार, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, योगेश जाधव, विकास पाटील, सचिन कोकाटे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. कामगार प्रतिनिधी मनोहर सन्मुख यांनी आभार मानले.