

सांगली : संजयनगर परिसरात सोमवारी सायंकाळी नशेखोरांनी हातात हत्यारे घेऊन तुफान धिंगाणा घातला. विविध ठिकाणी वाहनांची तोडफोड, खुर्च्यांची मोडतोड आणि नागरिकांना धमकावण्याच्या घडलेल्या या घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे व दहशतीचे सावट पसरले आहे. डॉक्टर लिमये रोड, पाटणे प्लॉट आणि महानगरपालिकेच्या घरकुल परिसरात झालेल्या या प्रकारामुळे संजयनगरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर बनला आहे.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास नशेत धुंद असलेल्या टवाळखोरांनी डॉक्टर लिमये रोड परिसरात राहणारे काँग्रेसचे युवानेते दीपक माने यांच्या घरासमोरील खुर्च्यांची तोडफोड करून धुमाकूळ घातला. इतकेच नव्हे, तर परिसरात उभ्या असलेल्या गाड्या फोडण्याची धमकी देत महिलांना अत्यंत हिणकस भाषेत शिवीगाळ करण्यात आली. या घटनेनंतर पाटणे प्लॉट भागातही खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. घरकुल परिसरातील गल्लीत उभी असलेली एमएच १० सी ०५७३ क्रमांकाची रिक्षा हत्याराने फोडून नशेखोरांनी मोठे नुकसान केले.
याप्रकरणी प्रतिमा दीपक माने (वय ३८, रा. संजयनगर) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांत संशयित आरोपी गणेश दुधाळ आणि सौरभ दुधाळ (दोघे रा. जगदाळे प्लॉट, सांगली) यांच्याविरुद्ध एनसीआर दाखल करण्यात आला आहे. घराबाहेर बसलेल्या वृद्ध महिलेला नशेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी डॉक्टर लिमये रोडवर तातडीने पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
दरम्यान, संजयनगर परिसरात उघड्यावर चालणारी गांजाविक्री, अमली पदार्थांचे सेवन करून नशेखोरांनी घातलेला धिंगाणा आणि तोडफोडीच्या घटनांमुळे स्थानिकांचा संयम सुटत चालला आहे. काही दिवसांपूर्वीच विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत नागरिकांनी या समस्येकडे लक्ष वेधले होते. मात्र, वरिष्ठांच्या बैठकीनंतरही नशेखोरांचे धाडस कायम राहिल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी अमली पदार्थांच्या विक्रीला आणि नशेखोरांच्या गुन्हेगारीला तातडीने वेसण घालावी, अन्यथा संजयनगर पोलिस ठाण्यावर धडक मोर्चा काढू, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.