

उद्धव पाटील
सांगली : शहरासह उपनगरात अनेक ठिकाणी स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. अनेक भागांत गटारी साफ करण्यात आलेल्या नाहीत. ठिकठिकाणी गटारी तुंबलेल्या असून सांडपाणी साचून राहत आहे. परिणामी दुर्गंधी, डासांची उत्पत्ती आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नालेही गवत, पाणकणसांनी भरले आहेत. पावसाळा तोंडावर आला असताना महानगरपालिका प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरातील अनेक गटारींमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, कचरा आणि गाळ साचून राहिला आहे. काही ठिकाणी गटारीला नैसर्गिक उतार नसल्याने सांडपाणी पुढे वाहत नाही. काही ठिकाणी गटारी बांधण्यात आल्या असल्या तरी त्या पुढे मुख्य वाहिनीला जोडलेल्या नसल्याने पाणी जागेवरच तुंबून राहत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली आहे. काही भागांत गटारीवर स्लॅब किंवा फरशी टाकण्याऐवजी सरळ गटार मजवून ये-जा सुरू आहे. काही रस्त्यांवर फक्तएका बाजूला गटार असून दुसऱ्या बाजूचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना चिखल, घाण आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
पत्रकारनगर, गारपीर चौक परिसर, शामरावनगर, हसनी आश्रम परिसर, वानलेसवाडी भाग यासह शहरातील अनेक ठिकाणी हीच अवस्था दिसून येत आहे. तुंबलेल्या गटारी, साचलेले पाणी आणि नियमित साफसफाईचा अभाव यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याची तक्रार वारंवार केली जाते. उपलब्ध कर्मचाऱ्यांचेही योग्य नियोजन होत नसल्याने सफाईकामावर परिणाम होत आहे. काही भागांत अनेक दिवस झाडलोटही होत नसल्याचे नागरिक सांगतात.
नालेसफाईचाही प्रश्न गंभीर बनला आहे. विजयनगर चौकापासून कुंभारमळ्याकडे जाणारा नाला पूर्णपणे तुंबलेला असून त्यात पाणकणीस, पाणगवत आणि झुडपे वाढलेली आहेत. शहरातील अनेक नाल्यांची अवस्था याहून वेगळी नाही. नाल्यांमधील अडथळे दूर न केल्यास पावसाळ्यात पाणी रस्त्यावर येऊन वस्त्यांमध्ये शिरण्याचा धोका आहे.
नागरिकांनी प्रशासनाला वेळोवेळी तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यापूर्वी तातडीने गटारसफाई, नालेसफाई, कचरा उपसा आणि स्वच्छता यंत्रणा सक्षम करण्याची गरज व्यक्तहोत आहे. अन्यथा पहिल्याच पावसात शहरातील स्वच्छतेचा आणि नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.