

सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील एका महाविद्यालयात नीट परीक्षेवेळी विद्यार्थी व विद्यार्थींनीशी शिक्षकांनी असभ्य वर्तन केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. परीक्षेला बसण्यापूर्वी विद्यार्थ्यांना कपडे उलटे घालण्यास भाग पाडले. या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटत आहे. सामाजिक संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दि. 7 मे रोजी सांगलीत एका महाविद्यालयात नीट परीक्षा पार पडल्या. विद्यार्थी व विद्यार्थिनी परीक्षेपूर्वी एक तास अगोदर महाविद्यालयात आल्या होत्या. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित केले. परीक्षेला बसण्यापूर्वी सर्वांनी एका वर्गात जावून कपडे उलटे घालण्यास सांगण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे मोबाईल एका ठिकाणी जमा करून घेण्यात आले होते. या प्रकारामुळे विद्यार्थीही अचंबित झाले; परंतु परीक्षा द्यायची असल्याने या विद्यार्थ्यांनी काहीही न बोलता कपडे उलटे घालून पेपर दिला.
विद्यार्थ्यांनी घरी गेल्यानंतर पालकांना हा प्रकार सांगितला. पालकांनी महाविद्यालयात जावून शिक्षकांना जाब विचारला. मात्र शिक्षकांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे पालकांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीही महाविद्यालयातील व्यवस्थापनाशी संपर्क साधून नेमका काय प्रकार घडला आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु शिक्षकांनी यावर बोलण्याचे टाळले.