

कवठेमहांकाळ ः कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड (एस) फाट्यावरील मोहन माळी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा आणि निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जेवणात अळ्या आढळल्याचे सांगितल्यास संस्थाचालक मोहन माळी मारहाण करत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केल्याने, संतप्त पालकांनी गुरुवारी (दि. 17) दुपारी शाळेच्या आवारात गोंधळ घातला. मुलांना ताब्यात देण्याची मागणी केली. याप्रकरणी संस्थाचालक मोहन माळी यांच्याविरोधात कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
अलकुड (एस) फाट्यावर असलेल्या मोहन माळी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये मुंबई आणि पुणे परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते, तसेच तक्रार केल्यास शिवीगाळ करून मारहाण केली जाते आणि चुकीची वागणूक दिली जाते, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी पालकांकडे केली होती. यामुळे गुरुवारी दुपारी मुंबई आणि पुणे येथून 22 मुलांचे पालक कवठेमहांकाळ येथे दाखल झाले. सर्वप्रथम त्यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाणे गाठून पोलिसांशी चर्चा केली. चर्चेनंतर, सर्व पालकांनी आपले पाल्य शाळेतून सुखरूप बाहेर काढून कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. यानंतर शाळेवर धडक दिली.
घटनास्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कवठेमहांकाळ पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी सर्व पालकांना शांततेचे आवाहन केले. शाळेतून विद्यार्थ्यांना बाहेर काढून पालकांच्या ताब्यात देण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यांनी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना धीर देत संस्थाचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली असून, तिने विद्यार्थी व पालकांचे जबाब घेतले आहेत. त्यानंतर पाचसदस्यीय समितीद्वारे मुलांना मारहाण करणे आणि निकृष्ट आहाराबाबत वस्तुनिष्ठ चौकशी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती कवठेमहांकाळ पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विश्वास साबळे यांनी दिली.