

बोरगाव : कोणतीही मागणी नसताना राज्य शासनाकडून शेतकऱ्यांवर शक्तिपीठ महामार्ग लादला जात असल्याचा आरोप करत वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी प्रस्तावित सर्वेक्षणाला तीव्र विरोध दर्शविला. महामार्गाच्या मोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा दाखल होणार असल्याची माहिती मिळताच शक्तिपीठविरोधी संघर्ष समितीने एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळी नऊ वाजल्यापासून मसुचीवाडी, जुनेखेड, नवेखेड, बोरगाव, वाळवा, ईश्वरपूर, कामेरी, इटकरे आणि ऐतवडे खुर्द आदी बाधित गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने संभाव्य सर्वेक्षणस्थळी जमा झाले. या आंदोलनात महिला शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
मसुचीवाडी परिसरातील नाईकबा रस्ता-भवांडा, जुनेखेड येथील सहदेव रंगराव पाटील यांच्या घराशेजारी, नवेखेड येथील चांदोली वसाहत बसथांबा, तसेच नवेखेड-ईश्वरपूर रस्त्यावरील तुरचकर वस्ती परिसरात शेतकऱ्यांनी विशेष लक्ष ठेवले होते. शासनाच्या वाहनांसह सर्वेक्षणासाठी येणाऱ्या यंत्रणेला रोखण्यासाठी शेतकरी दिवसभर ठाण मांडून बसले होते.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी कार्यालयाने २० नोव्हेंबर रोजी तहसीलदारांना पाठवलेल्या पत्रात, बाधित गावांतील प्रस्तावित भूसंपादन क्षेत्राचे जीसीपी मार्किंग व ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हे सर्वेक्षण केवळ भौगोलिक माहिती संकलित करून तांत्रिक नकाशे तयार करण्यासाठी असून, यावेळी शेतजमिनींची संयुक्त मोजणी होणार नसल्याचे पत्रात नमूद केले आहे. ग्रामस्थांमध्ये गैरसमज होऊ नये म्हणून जनजागृती करण्याचे निर्देशही या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.
मात्र, शेतकऱ्यांनी या प्रक्रियेलाही आपला विरोध कायम ठेवला. शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत आमच्या जमिनीची मोजणी होऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त करत शेतकऱ्यांनी दिवसभर आंदोलनात्मक भूमिका घेतली. दरम्यान, दिवसभरात प्रशासनाकडून प्रत्यक्ष सर्वेक्षणाची कोणतीही हालचाल दिसून आली नाही.