Sangli Municipal Corporation: गॅसलाईन, केबलसाठी रस्ते खोदाई बंद करा

स्थायी सभेत आदेश : 'एअरटेल'कडून वसूल होणार भरपाई
Sangli Municipal Corporation
Sangli Municipal CorporationPudhari Photo
Published on
Updated on

सांगली : गॅसलाईन तसेच मोबाईल कंपन्यांच्या कामासाठी सध्या सुरू असणारी रस्ते खोदाई तत्काळ बंद करा, पावसाळ्यात अशा कामांना परवानगी देऊ नका, रस्ते खोदाईमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल स्थायी समितीच्या पुढील सभेत सादर करा, असे आदेश सभापती अतुल माने यांनी दिले.

'एअरटेल'कडून शहरात मोबाईल केबलसाठी अंडरग्राऊंड ड्रिलिंग सुरू आहे. या ड्रिलिंगवेळी सात ते आठ ठिकाणी महापालिकेच्या जलवाहिन्या, ड्रेनेजवाहिन्या फुटल्या आहेत. त्याच्या भरपाईचे सुमारे ४ ते ५ लाख रुपये वसूल करावेत, असे आदेशही माने यांनी दिले.

महापालिकेत शुक्रवारी स्थायी समिती सभा झाली. सभापती अतुल माने अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तसेच समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते. गॅसलाईन, मोबाईल कंपन्यांनी सुरू केलेल्या खोदाईमुळे रस्ते चिखलमय होऊन अपघातांचे प्रमाण वाढत आहे. पावसाळा सुरू असतानाही कंपन्यांनी रस्ते फोडायला सुरुवात केल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यावर सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. या कंपन्यांना प्रशासनाने परस्पर मान्यता दिल्याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले. त्यावर स्थायी समितीच्या मान्यतेशिवाय रस्ते खोदाईस परवानगी देऊ नये, असे निर्देश माने यांनी दिले.

भरपाईच्या ७ कोटीतून होणार पॅचवर्क

सभापती माने म्हणाले, महापालिका क्षेत्रात गॅसलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. नव्याने ८० किलोमीटर गॅसलाईनचे काम होणार आहे. त्यासाठी रस्ता खोदाई करावी लागणार आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी भारत पेट्रोलियमकडून ७ कोटी रुपये महापालिकेकडे जमा आहेत. त्यातून महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे पॅचवर्क केले जाणार आहे. त्यासाठी तत्काळ अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले होते. बांधकाम विभागाने शुक्रवारी दुपारनंतर आयुक्तांकडे अंदाजपत्रक सादर केले आहे. यापुढे कोणत्याही कंपनीचा रस्ता खोदाईचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आल्याशिवाय मंजुरी दिली जाऊ नये, असे निर्देश दिल्याचे सभापती माने यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news