Sangli Municipal Corporation : स्थायीच्या आठ सदस्यांची मुदत तीन महिन्यांनी संपणार

सदस्यांना धास्ती; मुदत संपतेय आणि निधी अडकलाय
Sangli Municipal Corporation
Sangli Municipal CorporationPudhari Photo
Published on: 
Updated on: 

सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीतील १६ पैकी ८ सदस्यांची मुदत तीन महिन्यांनी संपणार आहे. समितीतून बाहेर पडणाऱ्या सदस्यांची नावे चिठ्ठीतून काढली जाणार आहेत. त्यामुळे बाहेर पडावे लागणारे ते ८ सदस्य कोण, याबाबत उत्सुकता असून संबंधितांमध्ये धास्तीही आहे. परिणामी, विकासकामे मार्गी लावण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र, अंदाजपत्रकात अतिरिक्त ३० लाख रुपयांची तरतूद असतानाही या निधीतून कामांना मंजुरी देण्यास आयुक्त संजीता महापात्र यांनी असमर्थता व्यक्त केल्याने सदस्यांची कोंडी झाली आहे. मुदत संपतेय आणि निधी अडकलाय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या अंदाजपत्रकात स्थायी समितीच्या प्रत्येक सदस्यासाठी अतिरिक्त ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नगरसेवक म्हणून जनरल फंडात तरतूद केलेल्या ३० लाखांपैकी १५ लाख रुपयांच्या निधीतून कामांना मंजुरी मिळाली आहे. याशिवाय अंदाजपत्रकातील अतिरिक्त ३० लाख रुपयांच्या निधीतूनही विकासकामे मंजूर करावीत, अशी मागणी सदस्यांनी आयुक्तांकडे केली होती. मात्र, आयुक्तांनी अतिरिक्त निधीतील कामांना मंजुरी देण्यास नकार दिल्याने सदस्यांच्या अपेक्षांना धक्का बसला आहे.

स्थायी समितीच्या सोळा सदस्यांपैकी आठ सदस्यांची मुदत तीन महिन्यांनी, म्हणजेच मार्च २०२७ मध्ये संपणार आहे. त्यानंतर त्यांना समितीतून सक्तीने निवृत्त व्हावे लागणार आहे. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी आपल्या प्रभागातील रस्ते, गटारी, पाणीपुरवठा आणि अन्य मूलभूत सुविधांची कामे मंजूर करून घेण्यासाठी सदस्यांची धडपड सुरू आहे. मात्र, निधीच्या उपलब्धतेचा प्रश्न आणि आयुक्तांची भूमिका यामुळे विकासकामांचे प्रस्ताव पुढे सरकण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

गेल्या नऊ महिन्यांत नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये म्हणावी तशी विकासकामे झालेली नाहीत. नागरिकांकडून मूलभूत सुविधांबाबत सातत्याने तक्रारी होत आहेत. अशा परिस्थितीत स्थायी समिती सदस्यांना आपल्या प्रभागातील कामांसाठी प्रशासनाकडे निधीची मागणी करावी लागत आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती आणि दुष्काळामुळे शासनाने घातलेले निर्बंध यांचा आधार घेत विकासकामांवर मर्यादा आणल्या जात असल्याचे चित्र आहे.

एकीकडे पदाधिकाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर होत असताना सर्वसामान्य नगरसेवकांच्या विकासकामांना मात्र निधीअभावी अडथळे येत आहेत. स्थायी समितीतील आठ सदस्यांची मुदत संपण्यास अवघे तीन महिने शिल्लक असताना निधी अडवला जात असल्याने सदस्यांमध्ये नाराजी आहे. पदाधिकाऱ्यांना एक न्याय आणि नगरसेवकांना दुसरा, असा दुजाभाव प्रशासनाकडून का केला जात आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.