MSRTC Employee Suspension : कमी प्रवाशांसह फेरी; चालक-वाहक निलंबित

कमी उत्पन्न आणल्याचा ठपका; एसटी कामगार संघटनेकडून निषेध; निलंबन मागे घेण्याची मागणी
MSRTC Employee Suspension
सांगली : कामगार संघटनेकडून बसस्थानक आवारात निषेधाचा फलक लावण्यात आला आहे.
Published on: 
Updated on: 

सांगली : स्वारगेट (पुणे) येथून सांगलीकडे राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस घेऊन येताना कमी उत्पन्न आणल्याच्या कारणावरून या बसच्‍या चालक आणि वाहकावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा एसटी कामगार संघटनेच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. तसेच हे निलंबन तत्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

चालक जालिंदर बनसोडे आणि वाहक सुनील बसुगडे यांनी स्वारगेट ते सांगली मार्गावरून बस (क्र. एमएच १४ बीटी ४५९३) आणताना कमी प्रवासी आणून महामंडळाचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने शनिवारी त्यांचे निलंबन केले.

याबाबत कामगार संघटनेने आपली बाजू मांडताना स्पष्ट केले की, संबंधित बस सकाळी आठ वाजता स्वारगेट बस स्थानकावर लावण्यात आली होती आणि तिला कोणतेही अगाऊ आरक्षण नव्हते. या बसची सुटण्याची नियोजित वेळ सकाळी साडेआठची होती. त्याचवेळी स्वारगेट-कोल्हापूर, स्वारगेट-मिरज, स्वारगेट-शिराळा (साधी), स्वारगेट-सांगली (ई-शिवाई), स्वारगेट-कवठेमहांकाळ, स्वारगेट-नृसिंहवाडी, स्वारगेट-कोल्हापूर, स्वारगेट-विटा, स्वारगेट- कोल्हापूर व स्वारगेट-सांगली अशा १० बसेस एकाच प्लॅटफॉर्मवर लावण्यात आल्या होत्या.

११ वर्षे ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीची ही बस जुनी दिसत असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळाला, यात चालक-वाहकांचा कोणताही दोष नाही. तसेच मार्गावर कोणत्याही अधिकाऱ्याने बसची तपासणी न करता आणि कोणतीही चौकशी न करता थेट निलंबनाची कारवाई केल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. बेकायदेशीरपणे निलंबन करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर खातेनिहाय कारवाई करावी आणि संबंधित चालक-वाहकांना दोषमुक्त करावे, अशी मागणी कामगार संघटनेचे विभागीय अधिकारी अशोक खोत आणि सचिव जयदीप पाटील यांनी केली आहे.

जाता-येता ९,३५० रुपये उत्पन्न

बनसोडे व बसुगडे यांच्याकडील बस (क्र. एमएच १४ बीटी ४५९३) ही ११ वर्षे ६ महिन्यांहून अधिक जुनी आणि कालबाह्य मर्यादेपर्यंत आलेली असल्याने प्रवासी या बसमध्ये बसण्यास तयार नव्हते. वाहक बसुगडे यांनी स्वारगेट येथील वाहतूक नियंत्रक कक्षातून बस क्रमांक व मार्गाची उद्‍घोषणा (अनाऊन्सिंग) करून नियोजित वेळेतच बस सोडली. सुरुवातीला तीन आणि कात्रज येथे पाच प्रवासी बसमध्ये चढले. तसेच पारगाव खंडाळा नियंत्रण कक्षासह सर्व नियोजित थांब्यांवर बस थांबवून प्रवाशांची चढ-उतार करण्यात आली. या फेरीत जाता-येता ९,३५० रुपये उत्पन्न मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.