

सांगली : नॅचरल थेअरपीच्या नावाखाली थायलँड, बँकाॅक आदी ठिकाणी सुरू असणारा अनैतिक व्यवसाय कालांतराने मुंबई, पुण्यात आला. तो आता ग्रामीण भागात पाय पसरू लागला आहे. सांगली जिल्ह्यातही 'स्पा' अशा गोंडस नावाखाली अनैतिक कृत्य सुरू असल्याची चर्चा सतत होते आहे.
सांगली, विश्रामबाग परिसरात सुरू असणार्या अश्लील कॅफे हाऊसवर म्हणजेच मिनी लॉजवर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानने छापे टाकण्यासाठी आग्रह धरला. त्यामुळे पोलिसांना कारवाई करणे भाग पडले. परंतु सांगली, विश्रामबाग आणि मिरज परिसरात ग्रामीण भागात खुलेआम स्पा सेंटर सुरू आहेत.
पोलिसांना माहिती नाही, हे कसे शक्य आहे?
पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या जवळ कॅफे हाऊस सुरू होते आणि तेथे अश्लील चाळे सुरू असल्याची चर्चा आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील कॅफेबाहेर निरोधचा साठा सापडला. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या बरोबर समोर असणार्या एका कॅफेमध्ये बेड, बंदिस्त केबिन सापडल्या. सांगली शहरात एका कॅफेमध्ये निरोधची पाकिटे, गर्भनिरोधक गोळ्या सापडल्या. पण हे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानमुळे समोर आले. मग इतके दिवस याची खबर खात्यातील खबर्यांना का नव्हती? त्यांनाच स्पा सेंटरच्या मालकांकडून 'मलई'ही मोठी दिली जाते, अशी खात्यातच चर्चा आहे. ज्या-ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत असे गैरप्रकार सुरू आहेत. त्या ठाण्याच्या प्रभारींना कारवाईच्या सूचना न देता पोलिस अधीक्षकांनी विशेष पथक नेमून कारवाईचा धडाका लावला पाहिजे. अन्यथा अनैतिक व्यवसाय सुरू असणारे स्पा सेंटर बंद पाडण्यासाठी सामाजिक संस्थांना छापेमारी करण्याची वेळ येईल.
वसुलीबहाद्दर जोमात, उचलबांगडी कधी?
खात्यात राहून अवैध धंद्यांना पाठीशी घालणार्या 'त्या कारभार्यांवर' पोलिस अधीक्षकांनी थेट कारवाई केली पाहिजे. बर्याच वेळा वरिष्ठ अधिकार्यांना अंधारात ठेवून कारभार्यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. अशा बसुली बहाद्दरांची उचलबांगडी होणे गरजेचे आहे.
परजिल्ह्यांतील उच्चभ्रू ग्राहक
सांगली, मिरजेत सुरू असणार्या स्पा सेंटरमध्ये इतर जिल्ह्यांतून उच्चभ्रू ग्राहक येत असल्याची चर्चा आहे. एका स्पा सेंटरमध्ये अनोळखी ग्राहकाला केवळ स्पाची सेवा दिली जाते. परंतु नेहमी येणारे व ओळखीचे ग्राहक असल्यास त्यांना मात्र 'खास' सेवा दिली जात असल्याची चर्चा आहे. त्यासाठी ग्राहक ५ ते १० हजार मोजायला तयार असतात.
काही ठिकाणी मॉलिश सेंटर
सर्वच स्पा सेंटरमध्ये अनैतिक प्रकार चालत नसून काही स्पा सेंटरमध्ये आयुर्वेदिक शास्त्रानुसार मॉलिश केले जाते, तर काही ठिकाणी स्पा सेंटरमध्ये महिला व पुरुष दोघेही मॉलिशसाठी असतात. त्या ठिकाणी जाणार्यांना कोणाकडून मॉलिश करून घ्यायचे हा पर्याय असतो.