

सांगली : सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची नियुक्ती झाली आहे. घुगे यांची मुंबई येथे राज्य गुप्तवार्ता विभागात पोलिस उपायुक्तपदी निवड झाली.
घुगे यांचा सांगलीतील कार्यकाळ पूर्ण होत आल्याने काही दिवसांपासून त्यांच्या बदलीची चर्चा पोलिस वर्तुळात सुरू होती. या पदासाठी अनेक नावांची चर्चा होती. अखेर दोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. ते यापूर्वी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या घडामोडींमुळे चर्चेत होते.
सांगली जिल्ह्यात काही महिन्यांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढती नशेखोरी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारीला कसा लगाम घालणार, हा गंभीर प्रश्न आहे. नशेखोरी, वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांची निर्मिती, साठा आणि वितरणाची साखळी नष्ट करण्याचे आव्हान दोशी यांच्यासमोर आहे.