

तासगाव : अंजनी (ता. तासगाव) येथील सर्पमित्र राहुल शंकर पाटील (वय ४७) यांचा नागाचा खेळ करताना सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. सर्पदंश झाल्यानंतर उपचार घेण्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
राहुल पाटील पाच वर्षांपासून परिसरात सर्पमित्र म्हणून काम करीत होते. सोमवारी त्यांनी डोंगरसोनी रस्त्यालगत असणाऱ्या एका घरातून नागाची सुटका केली होती. मात्र, नाग पकडल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात न सोडता प्लास्टिकच्या बरणीत घेऊन ते गावात आले होते. अंजनी येथे एका ठिकाणी हा नाग अंगावर घेऊन खेळ करत असताना नागाने त्यांच्या हाताच्या अंगठ्याला दंश केला.
दंश झाल्यानंतर वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली. सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रात आणताना राहुल यांची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे समजताच वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा कुंभार आणि रुग्णवाहिका चालक योगेश काटे यांनी तत्परता दाखवली. त्यांनी राहुल यांना पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
यापूर्वीही दोन वेळा दंश
पाटील यांना यापूर्वीही दोन वेळा सर्पदंश झाला होता. त्यातून ते बचावले होते. त्यामुळे पाटील यांनी यावेळीही नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. सर्पदंश झाल्यानंतर ते तब्बल एक तास रुग्णालयात न जाताच सापाचा खेळ करत होते, असे अंजनी गावातून सांगण्यात आले.