Sangli News| कोल्हापूरच्या राजेश क्षीरसागर यांचे सांगलीत काय काम?

महासभेत ५९२ कोटींच्या कामावरून महापौरांचा संताप
Sangli municipal corporation |
Sangli municipal corporation |Pudhari Photo
Published on: 
Updated on: 

सांगली : महापालिका क्षेत्रातील पावसाळी पाणी निचरा आणि शहरी पूर नियंत्रण प्रकल्पाच्या ५९२ कोटी रुपयांच्या वर्कऑर्डरवरून सोमवारी महासभेत जोरदार धुमश्चक्री झाली. ‘५९२ कोटींच्या कामांसंदर्भात कोल्हापूरचे राजेश क्षीरसागर (शिवसेना) सांगलीत येऊन बैठका घेतात. अधिकाऱ्यांना घेऊन बैठका घेण्याचा त्यांचा काय संबंध? त्यांचे सांगलीत काय काम?’, असा सवाल महापौर धीरज सूर्यवंशी यांनी उपस्थित केला.

महापालिकेत सोमवारी महासभा झाली. महापौर धीरज सूर्यवंशी अध्यक्षस्थानी होते. सभेत पावसाळी पाणी निचरा आणि शहरी पूर नियंत्रण प्रकल्पाच्या ५९२ कोटी रुपयांच्या वर्कऑर्डरवरून महापालिका प्रशासनाविरोधात सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी आणि विरोधी काँग्रेस एकवटली असताना, शिवसेनेचे गटनेते युवराज बावडेकर यांनी प्रशासनाच्या भूमिकेला पाठिंबा दिला. यावर सभापती अतुल माने उसळून उठले. ते म्हणाले, निधीला विरोध नाही. महासभा, स्थायी समितीला डावलून सुरू असलेल्या प्रक्रियेला विरोध आहे. त्यावर बावडेकर यांनी सभापतींच्या निवेदनाला बगल देऊन, वर्कऑर्डर दिल्याबद्दल आयुक्त संजीता महापात्र यांचे अभिनंदन केले. पंधरा दिवसांत काम सुरू न केल्यास जनआंदोलन करू, अशी भूमिकाही त्यांनी घेतली. त्यावर महापौर सूर्यवंशी संतापले. ‘भाजप, राष्ट्रवादीचा एमआरडीपीच्या निधीला, कामांना विरोध नाही. महासभा, स्थायी समितीला डावलून सर्वकाही सुरू आहे, त्याला विरोध आहे. पक्षाच्या विरोधातील वक्तव्य सहन करणार नाही. कोल्हापूरचे राजेश क्षीरसागर सांगलीत येऊन अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात. त्यांचा काय संबंध?’ असे ते म्हणाले.

त्यावर बावडेकर म्हणाले, त्यांनी कोल्हापुरातून सांगलीत येण्याची गरज का भासली, हे तुम्हीच सांगा. त्यावर सभापती माने म्हणाले, सांगलीतील कामांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील सक्षम आहेत. दरम्यान, कोल्हापूरला सांगलीतून संचालक नेण्याची गरज पडतेय, असा टोला महापौर सूर्यवंशी यांनी (‘गोकुळ’च्या पार्श्वभूमीवर) लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.