

जत : सिंगनहळ्ळी (ता. जत) येथे वृध्द महिलेचा शेतालगतच्या खांबातून विजेचा जोरदार धक्का बसल्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवार, दि. ४ जुलै रोजी घडली. रत्नाबाई दासू कांबळे (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी जत पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नाबाई कांबळे या शनिवारी ओढ्यालगतच्या शेतात चालत जात होत्या. यावेळी त्यांनी वाटेवरील विद्युत खांबाला हात लावला. त्यावेळी त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. हे लक्षात येताचा मुलगा जनार्दन दासू कांबळे याने त्यांना तातडीने बाजूला करून जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती डॉ. शेख यांनी दूरध्वनीद्वारे जत पोलिसांना दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.