Sangali news | श्रीनाथ देवस्थान ट्रस्टचा ‘भोंगळ’ कारभार

राजकीय वरदहस्ताने प्रकरण दडपल्याचा आरोप
Corruption
CorruptionPudhari
Published on
Updated on

आटपाडी : खरसुंडी येथील प्रसिद्ध श्रीनाथ देवस्थान ट्रस्टच्या अनागोंदी कारभार आणि १८१ किलो चांदीच्या हिशोबावरून सामाजिक कार्यकर्ते शेखर निचळ यांनी ट्रस्टवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केला. राजकीय वरदहस्ताने प्रकरण दडपले जात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

निचळ यांनी आज (दि.२५ ) पत्रकार परिषदेत ट्रस्टच्या कारभारातील अनेक गंभीर त्रुटींवर बोट ठेवले आहे. देवस्थानात जमा झालेल्या १८१ किलो चांदीची नोंद धर्मादाय कायद्याप्रमाणे का करण्यात आली नाही? तसेच चांदीच्या रथासाठी वापरलेल्या तब्बल ३२० किलो चांदीचे दान नेमके कोणत्या भाविकांनी दिले, याची यादी सार्वजनिक का केली जात नाही, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. चांदीच्या हिशोबात मोठी तफावत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, ऐतिहासिक हेमाडपंती मंदिरावर चांदीचे काम करताना पुरातत्व विभागाची परवानगी घेतली होती का, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. चांदी बसवण्यासाठी मूळ दगडी खांबांना ड्रिल करण्यात आल्याचा आरोप निचळ यांनी केला असून, यामुळे मंदिराच्या मूळ वास्तूला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ट्रस्टच्या कारभारावर प्रश्नांची सरबत्ती करताना निचळ यांनी तिजोरीच्या चाव्या अध्यक्षांच्या मुलाकडे कशा, ट्रस्टच्या नोंदीतून ‘महाराजांचे’ नाव का वगळले, तसेच चांदी काढून नेताना जबाबदार विश्वस्त का अनुपस्थित होते, असे मुद्दे उपस्थित केले आहेत. या सर्व प्रकारामुळे निष्पाप पुजारी समाजाची नाहक बदनामी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “जोपर्यंत १८१ किलो चांदीचा हिशोब मिळत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. माहिती अधिकारातून सर्व माहिती मागवली असून, ट्रस्टविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करणार,” असा इशारा शेखर निचळ यांनी दिला आहे.

या गंभीर आरोपांमुळे खरसुंडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आता श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट यावर काय भूमिका घेणार, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news