

निंबळक : शिरगाव (ता. तासगाव) येथे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात दहा शेळ्यांचा मृत्यू झाला. येथील शेळीपालक शेतकरी तुषार पाटील यांच्या बंदिस्त शेडमध्ये शिरून कुत्र्यांनी धुमाकूळ घातला. या हल्ल्यामध्ये पाटील यांचे सुमारे एक लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे.
शिरगाव येथील तुषार पाटील यांचा गावापासून काही अंतरावर राजापूर फाटा येथे जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यात त्यांनी शेळ्या व इतर जनावरे पाळली आहेत. राजापूर फाटा परिसरात हॉटेल व्यवसाय आणि मटण विक्रीच्या दुकानांची संख्या मोठी असल्याने या भागात मोकाट कुत्र्यांचा वावर लक्षणीय वाढला आहे. रात्रीच्या वेळी भुकेलेल्या कुत्र्यांनी पाटील यांच्या शेडची जमीन उकरून जाळीच्या खालून आत प्रवेश केला आणि शेळ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात दहा शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने राजापूर फाट्यावरील हॉटेल व दुकानातील वेस्टेजची विल्हेवाट लावण्यासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. तसेच, मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांमधून होत आहे.
‘वेस्टेज’मुळे कुत्र्यांची वर्दळ
राजापूर फाटा परिसरातील हॉटेल आणि दुकानांमधील उरलेले अन्न व वेस्टेज पदार्थ शेजारील गायरान माळावर उघड्यावर टाकले जातात. यामुळे या भागात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्याचा फटका आता शेतकऱ्यांना बसू लागला आहे. या कुत्र्यांमुळे विटा-तासगाव रस्ता परिसरात अपघातांचे प्रमाणही वाढले असल्याचे चित्र आहे.