Sangli Crime: शिरगाव येथे शाळेत लिपिकाला मारहाण

पाच जणांवर गुन्हा : घटना सीसीटीव्हीत कैद
 Crime News
Crime News Pudhari
Published on
Updated on

तासगाव : शिरगाव-विसापूर (ता. तासगाव) येथील माध्यमिक शाळेच्या लिपिकाला शाळेत घुसून बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चित्तरंजन निवृत्ती शिंदे (वय 40, रा. नरसोबा गल्ली, तासगाव) असे जखमीचे नाव आहे.

याप्रकरणी नितीन शहाजी पाटील, संजय भानुदास पाटील, शांताराम नामदेव पाटील, रामचंद्र नारायण पाटील आणि कृष्णा रामचंद्र पाटील (सर्व रा. शिरगाव) या संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दीपक नारायण पाटील काही दिवसांपूर्वी निवृत्त झाले आहेत. त्यांनी शाळेतील गैरकारभाराबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती, ज्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू आहे.

दुसरीकडे, निवृत्त मुख्याध्यापक दीपक पाटील यांच्याविषयी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी, उपसंचालक (कोल्हापूर) आणि वेतन विभागाचे अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून संशयित नितीन पाटील आणि इतर चार जण शाळेत आले. त्यांनी लिपिक चित्तरंजन शिंदे यांना बोलावून घेऊन, ‌‘दीपक पाटील यांच्याबद्दल वरिष्ठांकडे तक्रार का केली?‌’ अशी विचारणा केली. त्यावर शिंदे यांनी ‌‘मी लेखी तक्रार केली आहे, तुम्ही मला लेखी विचारा‌’, असे उत्तर दिले.

संशयित नितीन पाटील, संजय पाटील, शांताराम पाटील यांनी लोखंडी रॉड आणि काठीने शिंदे यांना मारहाण करून जखमी केले. रामचंद्र आणि कृष्णा पाटील यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिंदे यांना जखमी केले. तासगाव पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news