

दिलीप जाधव
कवठेमहांकाळ : केंद्र आणि राज्य शासनाने ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचविण्यासाठी राबविलेल्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेचे शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) अक्षरश: तीनतेरा वाजले आहेत. जवळपास दीड कोटी रुपये खर्च करून उभारलेली पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास गेली आहे, मात्र वीज जोडणी कामातील प्रचंड दिरंगाईमुळे संपूर्ण योजनाच बंद अवस्थेत पडून आहे. परिणामी साडेतीन हजार शिरढोणकर वर्षभरापासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, योजनेसाठी आवश्यक वीज जोडणीच्या कामाचा कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) २३ मे २०२५ रोजी देण्यात आला होता. नियमानुसार २३ सप्टेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण होणे बंधनकारक होते. मुदत संपून अनेक महिने लोटले, तरी काम पूर्ण झाले नाही. ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणाच्या जोडीला असलेला यंत्रणेचा बेजबाबदारपणा यामुळे योजना चालू होण्यापूर्वीच बंद पडली आहे.
गावात पाणी योजना तयार आहे, नळ जोडले आहेत, पण पिण्यासाठी पाण्याचा एक थेंब मिळत नाही. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले, पण ग्रामस्थांच्या पदरी कोरडे नळ आणि रिकामे हंडेच आहेत. ही परिस्थिती जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
गेल्या वर्षभरापासून गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः संघर्ष करावा लागत आहे. उन्हाळ्यात अनेकांना विहिरी आणि खासगी पाण्याच्या स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. एका बाजूला शासन 'हर घर जल'च्या घोषणा करत आहे, तर दुसऱ्या बाजूला शिरढोण गावात ‘हर घर त्रास’ अशी परिस्थिती आहे.
ग्रामपंचायत पदाधिकारीच गांधारीच्या भूमिकेत
याबाबत माजी उपसरपंच शामराव पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यांत्रिकी विभागाने २३ मे २०२५ रोजी कार्यारंभ आदेशाची प्रत शिरढोण ग्रामपंचायतीला पाठवली आहे. काम वेळेत पूर्ण का झाले नाही? दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर अद्याप कारवाई का झाली नाही? हे बघण्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. परंतु ग्रामपंचायतीचे कारभारीच वर्षभरापासून डोळ्यावर गांधारीची पट्टी बांधून बसलेले आहेत. ठेकदारापेक्षाही मोठी चूक ग्रामपंचायतीची आहे.