Sangli Accident : शिराळ्यातील तरुण ठार; तिघेजण गंभीर जखमी

आष्टा-ईश्वरपूर मार्गावरील पडवळवाडी फाट्याजवळील घटना
Sangli Accident News
Sangli Accident News
Published on: 
Updated on: 

आष्टा : आष्टा-ईश्वरपूर मार्गावरील पडवळवाडी फाट्याजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची रिक्षाला धडक बसून झालेल्या अपघातात एक जण ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले. बुधवारी (ता. २५) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली असून आष्टा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय यशवंत कदम (रा. शिराळा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर सुमन विलास कटरे, अश्विनी दादासोा कटरे आणि अविनाश दादासोा कटरे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. रिक्षाचालक बाजीराव संभाजी घोडके (वय ३६, रा. शिराळा) यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरचालक पंकज हिरामन महाले (रा. दसवेल, ता. शिंदखेडा, जि. धुळे) याच्याविरुद्ध आष्टा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव घोडके हे रिक्षा (एमएच ५० एम २९७२) घेऊन ईश्वरपूरहून आष्ट्याकडे येत होते. त्यांच्या पुढे उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या जोडलेला ट्रॅक्टर (एमएच १६ डीसी ६३५७) जात होता. पडवळवाडी फाट्याजवळ ट्रॅक्टरचालकाने ब्रेक लावल्याने मागील ट्रॉलीला झटका बसून ती रस्त्याच्या पांढऱ्या पट्ट्याकडे सरकली आणि रिक्षाच्या समोरील बाजूस जोरदार धडकली. सर्व जखमींना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान दत्तात्रय कदम यांचा मृत्यू झाला. निष्काळजीपणे वेगाने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी आष्टा पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.