Sangli News| दुष्काळ यादीत शिराळा-वाळव्याचा समावेश करा

अन्यथा १० ऑक्टोबरला आंदोलनाचा माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचा इशारा
Crop Damage
पावसाअभावी खरीप पिके कोमेजलीpudhari file photo
Published on: 
Updated on: 

शिराळा : राज्य शासनाने २५ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत शिराळा तालुक्यासह शिराळा विधानसभा मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील संबंधित गावांचा समावेश करण्यात आलेला नाही. ही बाब शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. शासनाने पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शिराळा-वाळव्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा; अन्यथा १० ऑक्टोबरला शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिला.

नाईक म्हणाले, शेजारील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, राधानगरी व गगनबावडा यांसारख्या अतिवृष्टी व विक्रमी पावसाची नोंद होणाऱ्या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, डोंगराळ, दुर्गम व अतिमागास असलेल्या शिराळा तालुक्याचा तसेच शिराळा विधानसभा मतदार संघातील वाळवा तालुक्यातील संबंधित गावांचा समावेश न होणे ही आश्चर्याची बाब आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

शिराळा तालुक्यातील शिराळा, मांगले, सागाव, कोकरूड, चरण व शिरसी मंडलांचा, तसेच वाळवा तालुक्यातील कासेगाव, चिकुर्डे, कामेरी, कुरळप, पेठ व तांदुळवाडी मंडलातील गावांचा दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली. शिराळा तालुका डोंगराळ असल्याने वारणा व मोरणा नदीकाठचा भाग वगळता गुढे-पाचगणी, येळापूर, मेणी खोरा, पणुंब्रे तर्फ वारण, चरण, कोकरूड, बिळाशी यांसह पश्चिम व संपूर्ण उत्तर भागातील शिवार आणि माळरानातील पिकांना पावसाच्या उघडीपीचा मोठा फटका बसला आहे. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे व मशागतीवर केलेला खर्चही वाया गेला आहे. वाळवा तालुक्यातील संबंधित मंडलांमध्येही अशीच परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतीबरोबरच काही भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. डोंगरी तालुका असल्याने बहुतांश जमीन हलक्या प्रतीची असून, तिची पाणीधारण क्षमता कमी आहे. येथील बहुतांश शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. आठ-दहा दिवस पावसाने उघडीप दिली तरी पिके धोक्यात येतात. यंदा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने मोठी उघडीप दिल्याने खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. शिराळा विधानसभा मतदारसंघातील सर्व गावांमध्ये मंडलनिहाय पंचनामे करावेत, अशी मागणीही नाईक यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news