

शिराळा शहर : रासायनिक खतांच्या वाढत्या किमती आणि जमिनीची घटती सुपीकता यामुळे शेतकऱ्यांतून शिराळा तालुक्यात शेणखताला मोठ्या प्रमाणात मागणी वाढताना दिसत आहे. तसेच पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह नव्या पिढीतील शेतकरीही सेंद्रिय शेतीकडे वळत असून शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.
गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. शेणखतामुळे जमिनीत सूक्ष्मजिवांची वाढ होते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि पिकांना आवश्यक पोषकद्रव्ये नैसर्गिकरीत्या मिळतात. तालुक्यातील अनेक शेतकरी शेणाचा वापर करून खत तयार करत आहेत, तर काही शेतकरी शेणखत विकत घेण्याकडे वळले आहेत. यामुळे ग्रामीण भागात शेणखत विक्रीचा व्यवसायही वाढू लागला आहे. विशेषतः भाजीपाला, ऊस आणि फळबागांमध्ये शेणखताचा वापर वाढल्याचे चित्र आहे.