Sangli News : आरळ्यातील मुस्लिम न्यायासाठी गाव सोडणार

चालत कोल्हापुरात जाऊन धरणे आंदोलन करणार
Protest News
आंदोलन
Published on
Updated on

सांगली : शिराळा तालुक्यातील आरळा गावातील मुस्लिम समाजाने गावामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचा आरोप करत न्यायासाठी गाव सोडून मा. उच्च न्यायालय, खंडपीठ कोल्हापूर येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की काही वर्षांपासून गावात धार्मिक तेढ, सामाजिक दबाव आणि काही घटनांमुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित न्याय मिळाला नसल्याने स्थानिक प्रशासनावरील विश्वास कमी झाला आहे.

“आम्हाला आमच्या गावात सुरक्षितपणे राहता येत नसेल, तर न्यायालयाच्या दारात बसून न्याय मागू,” अशी भावना समाजातील नागरिकांनी पत्रकात व्यक्त केली आहे. गावात धार्मिक तेढ निर्माण करणारे कार्यक्रम, भडकाऊ भाषणे, मिरवणुका तसेच सोशल मीडियावर द्वेषपूर्ण प्रचार होत असल्याचा आरोप पत्रकात आहे. तसेच २८ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या घटनेत समूहाने हिंसाचार, मारहाण आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या सर्व घटनांबाबत संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या; मात्र ठोस प्रतिबंधात्मक कारवाई झालेली नाही, असेही पत्रकात म्हटले आहे. गावातील मुस्लिम समाजामध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढली आहे. मुस्लिम समाजाने काही प्रमुख मागण्या प्रशासन आणि शासनाकडे मांडल्या आहेत, अशी माहिती पत्रकात आहे.

यामध्ये संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई, कायमस्वरूपी पोलिस संरक्षण, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी, पीडितांना नुकसानभरपाई, सामाजिक सलोखा राखण्यासाठी विशेष उपाययोजना आणि आरळा येथे स्वतंत्र पोलिस चौकी स्थापन करण्याची मागणी पत्रकात केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news