

सांगली : शिगाव ता. मिरज येथील श्री लक्ष्मी देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी प्रकाश जगन्नाथ सदामते वय 32, रा. आमणापूर, ता. पलूस याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 60 हजार 410 रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले.
शिगाव येथील श्री लक्ष्मी देवीच्या मंदिरात दि. 17 ऑक्टोबर रोजी चोरी झाली होती. यावेळी चोरट्याने देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले होते. याचा छडा लावण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांनी दिले होते.
त्यानुसार गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक तपास करीत होते. त्यावेळी त्यांना शिगाव येथील मंदिरात चोरीस गेलेले दागिने विक्री करण्यासाठी एक वाळवा तालुक्यातील मिरजवाडी येथे येणार असल्याची माहिती कळेकर यांना मिळाली होती. त्यानुसार कळेकर यांच्या पथकाने मिरजवाडी येथे सापळा लावला होता. मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश सदामते हा त्या ठिकाणी आल्यानंतर पथकाने त्याला अटक केली.