Sangli News : नशेखोरी थांबली नाही, तर पोलिस मुख्यालयावर मोर्चा

सांगलीत शेतकरी संघटनेचा इशारा : विद्यार्थी, पालकांना आंदोलनात सहभागी करणार
Shetkari Sanghatana
Sangli News
Published on
Updated on

सांगली : जिल्ह्यातील तरुण-तरुणी अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालले असून, त्यामुळे गुन्हेगारीची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. येत्या महिनाभरात ही नशेखोरी थांबली नाही, तर विद्यार्थी आणि पालकांना सोबत घेऊन पोलिस मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

या संदर्भात शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा, युवा आघाडीचे अध्यक्ष संजय बेले, विश्वास कोळी, बाबा सांद्रे, भास्कर कदम, जगन्नाथ भोसले, संदीप चौगुले, धन्यकुमार पाटील उपस्थित होते.

संदीप राजोबा म्हणाले की, शहरी व ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, तरुण मंडळे आणि औद्योगिक वसाहतींमधील परप्रांतीय तरुण हे सध्या अंमली पदार्थ विक्रीचे मुख्य केंद्र बनले आहेत. जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रेत्यांनी उच्छाद मांडला असून, या नशेतूनच खून, चोरी, दरोडा, अपहरण आणि गँगवारसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. वेगवेगळ्या शर्यतींमध्येही अंमली पदार्थांचे सेवन करून वाद घालण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत.

हप्तेखोरीमुळे पोलिसांचे दुर्लक्ष?

जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्रीची सर्व पाळेमुळे आणि प्रमुख ठिकाणे पोलिस यंत्रणेला पूर्णपणे माहीत आहेत. मात्र, या बेकायदेशीर व्यवसायातून मिळणारे हप्ते थेट वरिष्ठ पातळीपर्यंत जात असल्यामुळे पोलिस जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा संशय जनतेच्या मनात निर्माण झाला आहे, असा थेट आरोप राजोबा यांनी केला. पोलिसांनी आपली खाकी वर्दीची ताकद दाखवून या रॅकेटचे समूळ उच्चाटन करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news