

सांगली : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या शास्त्री बागेत एका पिशवीत मृत अर्भक आढळून आल्याने गुरुवारी मोठी खळबळ उडाली. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात या घटनेमागील धक्कादायक वास्तव समोर आले. जन्मानंतर काही वेळातच अर्भकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंतिम संस्कार करण्याऐवजी, मृतदेह बाकड्यावर सोडून पिता दारू पिण्यास गेल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अशोक सुसलाद (वय 39, रा. आष्टा) असे पित्याचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आंबेडकर चौक परिसरातील लालबहादूर शास्त्री उद्यानात एका बाकड्यावर पिशवीत एक नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले. येथील दीपक स्वामिनाथन सिंग यांनी याबाबतची माहिती तत्काळ सांगली शासकीय रुग्णालयाला दिली. त्यानंतर रुग्णालयाच्या सीएमओ डॉ. पूजा सदाफुले यांनी पोलिसांना पाचारण केले. सांगली शहर पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास सुरू केला.
तपासादरम्यान हे बालक अवघ्या एका दिवसाचे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी रुग्णालयातील प्रसूती विभागात चौकशी केली असता, या अर्भकाच्या मातेची माहिती मिळाली. पोलिसांनी तिच्याकडे विचारणा केली असता, तिने पती अशोक सुसलाद हे अर्भक अंत्यविधीसाठी घेऊन गेल्याचे सांगितले. पोलिसांनी अधिक शोध घेऊन अशोक सुसलाद याला ताब्यात घेतले. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, बुधवारी त्याच्या पत्नीची प्रसूती झाली होती.
मात्र जन्मतःच शारीरिक विकृतीमुळे बाळाचा मृत्यू झाला होता. गुरुवारी सकाळी 8 वाजता डॉक्टरांनी मृत अर्भक अशोकच्या ताब्यात दिले. अर्भक एका पिशवीत घेऊन अशोक शास्त्री चौक परिसरात आला. तिथे तो एका दारूच्या दुकानात गेला. दारू पिल्यानंतर तो बागेतील एका बाकड्यावर बसला होता. दरम्यान, त्याला शौचास आल्यामुळे तो मृत अर्भक ठेवलेली पिशवी बाकावरच ठेवून सांगली बस स्थानकाच्या दिशेने निघून गेला. थोड्या वेळाने तो परत आला असता त्याला तिथे पिशवी दिसली नाही. त्यानंतर लोकांनी अर्भक पुन्हा रुग्णालयात नेल्याचे त्याला समजले.