

तासगाव : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनास मंजुरी मिळताच 26 जूनपासून सांगली जिल्ह्यातील महामार्ग जाणार्या गावांत मोजणी सुरू झालेली आहे. आटपाडी तालुक्यातील शेटफळे आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी व घाटनांद्रे गावांमध्ये मोजणीवेळी शेतकर्यांनी प्रचंड विरोध केला होता. आजपासून (दि. 7) तासगाव तालुक्यातील महामार्ग जाणार्या गावांमध्ये मोजणी करण्यात येणार आहे.
आमदार रोहित आर. आर. पाटील यांची शक्तिपीठ महामार्गाबाबतची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. शेतकरी मात्र महामार्गास तीव्र विरोध करण्याच्या भूमिकेत दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित आर. आर. पाटील अधिवेशनात व्यस्त असताना, त्यांचे कार्यकर्ते काय भूमिका घेणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. तासगाव तालुक्याच्या 10 गावांतील 3 हजार 877 शेतकर्यांची 553 गटातील 373.135 हेक्टर जमीन शक्तिपाठ महामार्गासाठी संपादित करण्यात येणार आहे. शक्तिपीठ महामार्गाची घोषणा झाली, तेव्हापासूनच तालुक्यातील शेतकर्यांनी या महामार्गाला विरोधच केलेला आहे. बागायती शेती जाऊन रस्ता मिळणार असेल, तर रस्ता उपयोगाचा नाही, महामार्गास आमचा विरोध राहील, अशीच भूमिका शेतकर्यांनी घेतली आहे.
आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने 2 जुलै रोजी तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघातील शेतकरी आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मुंबईत शक्तिपीठ महामार्गासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीबाबत मतदारसंघातील शेतकर्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. असे निर्णय शेतकर्यांना विश्वासात घेऊन घ्यायला हवे होते, अशा तक्रारीचा सूर ऐकायला मिळत आहे.