

सांगली : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त सांगली येथे शुक्रवार दि. 12 सप्टेंबररोजी येथील भावे नाट्यमंदिरात लोककला संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रा. सुकुमार कांबळे व प्रा. बाबुराव गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालणार्या या संमेलनाचे उद्घाटन अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांच्याहस्ते व सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. यावेळी शाहिरी व लोककला क्षेत्रात प्राधान्य मिळविलेल्या 11 कलाकारांना विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
या संमेलनामध्ये लोककला जीवन गौरव पुरस्कारप्राप्त अदिनाथ महाराज यांच्यासह राज्यभरतील शाहीर, गोंधळी, तमाशा, आराधी, वाघ्या मुरळी, बहुरूपी, वासुदेव असे विविध कलावंत सहभागी होणार आहेत. नियोजनासाठी दादासाहेब कस्तुरे, आकाश तिवडे, गॅब्रियल तिवडे यांच्यासह कार्यकर्त्यांची जिल्हा निमंत्रक समिती स्थापन करण्यात आली आहे. या कार्यक्रमास प्रा. बाबुराव गुरव, प्रा. सुकुमार कांबळे यांच्यासह विचारवंत मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शाहीर शीतल साठे, अनिकेत मोहिते, हेमंत मोहिते उपस्थित होते. लोककलाकारांनी संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष, माजी नगरसेविका शेवंता वाघमारे यांनी केले आहे.