

सांगली : शेरीनाल्याचे पाणी कृष्णा नदीत मिसळत असल्यामुळे नदीच्या एका बाजूला फेसयुक्त पाणी वाहताना दिसत आहे. यामुळे पाण्याला दुर्गंधी आली असून, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
संततधार पाऊस आणि कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 21 फुटावर गेली आहे. शेरीनाल्यामध्ये नदीचे पाणी परत गेल्यामुळे नाल्याचे पाणी कृष्णा नदीत मिसळत आहे. मोठ्याप्रमाणात शेरीनाल्याचे पाणी मिसळत असल्यामुळे नदीच्या पाण्याला दुर्गंधी आली आहे. घाटाच्या बाजूला फेसाळयुक्त पिवळसर पाणी वाहत आहे. काही ठिकाणाहून कारखान्याचेही पाणी सोडण्यात येत आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारीही करण्यात आल्या आहेत. याचे प्रदूषण मंडळाकडून दखल घेण्यात आलेली नाही. शेरीनाल्याचे पाणी उपसा करणारे पंप अनेकदा बंद पडतात. त्यामुळे शेरीनाल्याचे पाणी नदीत मिसळत राहते. याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.