Sangli News : सेवा पुस्तिका गहाळ; दिव्यांग महिला आठ वर्षांपासून पेन्शनपासून वंचित

प्रशासनाचा अंदाधुंदी कारभार; सदस्या वर्षा कांबळे यांचा आरोप : आंदोलनाचा इशारा
Sangli Zilla Parishad
सांगली जिल्हा परिषद
Published on
Updated on

सांगली : दिव्यांग आणि निराधार असलेल्या लीलाबाई सदाशिव सोनावळे यांना गेल्या आठ वर्षांपासून पेन्शनच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक (सर्व्हिस बुक) गहाळ झाल्याने हा प्रस्ताव रखडला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून पेन्शन मंजूर न केल्यास २२ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्या वर्षा कांबळे यांनी दिला आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

मिरज तालुक्यातील सोनी येथील सदाशिव केशव सोनावळे हे मिरज पंचायत समितीच्या बांधकाम विभागात मैलमजूर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर पत्नी तुळसाबाई यांना नियमानुसार पेन्शन सुरू होती. मात्र, तुळसाबाई यांचे निधन झाल्यानंतर हिंदू वारसा कायद्यानुसार त्यांच्या कायदेशीर वारस व दिव्यांग कन्या लीलाबाई सोनावळे यांच्या नावाने पेन्शन सुरू करण्यासाठी २०१८ मध्ये मिरज पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी जिल्हा परिषद कार्यालयाकडे पाठवण्यात आला. मात्र, बांधकाम विभागातील अनागोंदी कारभारामुळे सदाशिव सोनावळे यांचे मूळ सेवा पुस्तकच गहाळ करण्यात आले. सेवा पुस्तक उपलब्ध न झाल्याचे कारण पुढे करत लीलाबाई यांचा पेन्शन प्रस्ताव रद्द करण्यात आला. त्यामुळे २०१८ ते २०२६ या सुमारे आठ वर्षांच्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या लीलाबाई यांना पेन्शन मिळणे बंद झाले.

लीलाबाई या पूर्णपणे दिव्यांग व निराधार असून त्यांच्याकडे उपजीविकेचे कोणतेही साधन नाही. त्यांच्या दैनंदिन वैद्यकीय उपचाराचा खर्च नातेवाईक आणि समाजातील दानशूर व्यक्तींना करावा लागत आहे. प्रशासकीय निष्काळजीपणामुळे एका दिव्यांग महिलेवर उपासमारीची वेळ आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

सेवा पुस्तक गहाळ होण्यास कारणीभूत ठरलेल्या बांधकाम विभागातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी. तसेच सदाशिव सोनावळे यांचे सेवा पुस्तक शोधून किंवा पुनर्रचित करून लीलाबाई यांना आठ वर्षांची थकीत पेन्शन तत्काळ मंजूर करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मागणीचा विचार न झाल्यास २२ सप्टेंबर रोजी लीलाबाई सोनावळे यांच्यासह जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा वर्षा कांबळे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news