

मिरज : राज्यातील शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर शासनाने घातलेली बंदी अखेर उठवली असून, नवीन भरतीचा मार्ग आता सुकर झाला आहे. विधानपरिषदेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित करून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याची माहिती आमदार इद्रिस नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकारांशी बोलताना आमदार नायकवडी म्हणाले, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासोबतच त्यांची सुरक्षितताही अत्यंत महत्त्वाची असते. त्यासाठी आवश्यकतेनुसार कायमस्वरूपी शिक्षकेतर कर्मचारी असणे गरजेचे आहे. लवकरच शिपाई पदांवरील भरतीबंदीही उठवून ही भरती प्रक्रिया वेगाने सुरू होईल.
महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी शासन-प्रशासकीय प्रयत्नांसोबतच शिक्षकांची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षकांनी दर्जेदार शिक्षण दिल्यास पालक नक्कीच शासकीय शाळांकडे आकर्षित होतील; मात्र दुर्दैवाने काही ठिकाणी शिक्षक आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
महाआरोग्य शिबिरात ११ हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त मिरजेत आयोजित महाआरोग्य शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ११,३०९ रुग्णांनी नोंदणी केली होती. सर्व रुग्णांची सखोल तपासणी करून आवश्यक असणाऱ्यांना पुढील शस्त्रक्रियांसाठी संबंधित रुग्णालयांमध्ये पाठवले जाणार आहे. १ ते ५ वयोगटातील ६२ बालकांची हृदयरोगाशी संबंधित तपासणी करण्यात आली, ज्यातील २२ बालकांवर शस्त्रक्रिया केली जाईल. शिबिरादरम्यान २६ नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करत अर्ज भरले आहेत.